पंजाबराव डख: ‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही, शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; राज्यात १५ ऑक्टोबरपर्यंत हवामान कोरडे राहणार असल्याचा पंजाबराव डख यांचा अंदाज.
‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही
प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी, ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सांगायचं आहे की, कोणतं शक्ती चक्रीवादळ आपल्याकडे येणार नाही. काही घाबरायची आणि चिंता करायची गरज नाही,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे. टीव्हीवर चालणाऱ्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, हे चक्रीवादळ महाराष्ट्रात कोणताही मोठा पाऊस देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
६ आणि ७ ऑक्टोबरला केवळ तुरळक पाऊस
राज्यातील पावसाच्या स्थितीबद्दल बोलताना डख यांनी सांगितले की, ६ आणि ७ ऑक्टोबर या दोन दिवसांत राज्यात पाऊस असेल, पण तो सर्वदूर नसेल. हा पाऊस ‘भाग बदलत’ म्हणजे काही तुरळक ठिकाणीच पडेल. पावसाचे स्वरूपही १० मिनिटे, २० मिनिटे किंवा अर्धा तास रिमझिम सरींपुरते मर्यादित असेल. कुठेही मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.